संगमनेर :सुदिन न्यूज नेटवर्क
ब्रिटिशांच्या दीडशे वर्षांच्या परकीय सत्तेतून भारताला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी असंख्य स्वातंत्र्यसैनिक, देशभक्त आणि हुतात्म्यांनी बलिदान दिले. त्यांच्या त्यागामुळे आज आपण स्वतंत्र भारतात सुखाने जीवन जगत आहोत. त्यामुळे स्वातंत्र्यदिन हा केवळ उत्सवाचा दिवस नसून, देशा साठी बलिदान देणाऱ्या शूरवीरांचे स्मरण करण्याचा व राष्ट्रनिर्मितीची जबाबदारी स्वीकारण्याचा दिवस असल्याचे आमदार अमोल खताळ यांनी सांगितले.
संगमनेर तालुक्यातील धांदरफळ खुर्द येथील ग्रामविकास सेवा संघ संचलित श्री. बी. जे. खताळ जनता विद्यालयात स्वातंत्र्यदिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर संस्थेचे अध्यक्ष भास्कर खताळ, उपाध्यक्ष शंतनू मुळे, सचिव विजय खताळ, खजिनदार वैशाली मुळे, ज्येष्ठ नेते मुरलीधर खताळ, सरपंच लता खताळ उप सरपंच संदीप ठोंबरे ग्रामपंचायत अधिकारी राजेश गुंजाळ जिल्हा परिषद शाळेचे स्थानिक स्कूल कमिटी अध्यक्ष सतीश कोकणे, उपाध्यक्ष रूपाली खताळ रामनाथ देवगिरे अण्णासाहेब गोडसे रोहिदास खताळ यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.आ खताळ म्हणाले की, स्वातंत्र्या नंतर संविधान आणि लोकशाहीच्या माध्यमातून प्रत्येक नागरिकाला समान संधी उपलब्ध करून देण्यात आली. देशात भाषा, संस्कृती, परंपरा आणि विविधतेचे अनेक रंग असले तरी भारताची एकात्मता आणि अखंडता हीच आपली खरी ताकद आहे. आज जागतिक पातळीवर भारताचा सन्मानाने उल्लेख केला जात असून, देशाने विविध क्षेत्रांत उल्लेखनीय प्रगती केली आहे. विद्यार्थ्यांनी शिक्षण, संस्कार आणि राष्ट्रसेवेची कास धरून भारताच्या उज्ज्वल भविष्यासाठी योगदान द्यावे. आजच्या धकाधकीच्या जीवनात पर्यावरणाचा समतोल राखणे आणि जलसंवर्धन करणे अत्यंत गरजेचे आहे. यासाठी शालेय जीवनापासूनच विद्यार्थ्यांमध्ये पर्यावरण, पाणी बचत आणि सामाजिक जबाबदारीबाबत जागृती निर्माण झाली पाहिजे.
माजी मंत्री स्वर्गीय बी. जे. खताळ पाटील यांनी महाराष्ट्राच्या सामाजिक आणि राजकीय जीवनात आपल्या कार्याचा वेगळा ठसा उमटवला. आजही महाराष्ट्रातील अनेक आमदारांशी चर्चा करताना त्यांच्या कार्याचा आणि त्यांनी केलेल्या विकासकामांचा आवर्जून उल्लेख केला जातो. आपल्या गावचे भूषण आणि मार्गदर्शक म्हणून त्यांच्या कार्याचा आम्हाला सदैव अभिमान असल्याचे आमदार खताळ यांनी सांगितले.
पुढील वर्षी शाळेसाठी कायमस्वरूपी स्टेज उभारणार
पुढील वर्षी शाळेसाठी कायमस्वरूपी स्टेज उभारण्यासाठी स्वतःच्या वैयक्तिक निधीतून खर्च करणार आहे. शाळेच्या विकासासाठी माझ्याकडूनही अजून बरेच काम बाकी आहे. जागेचा प्रश्न सुटला आहे. आता शाळेतील विद्यार्थ्यांची पटसंख्या वाढविण्यासाठी परिसरातील पालक आणि नागरिकांनीही पुढाकार घ्यावा. राजकारण हे निवडणुकीपुरते असते; मात्र समाजकारण आणि विकासाचे काम सातत्याने सुरू राहिले पाहिजे.
— अमोल खताळ, आमदार
