Join Us

Call SUDINNEWS ब्रेकिंग : सुदिनन्यूजसाठी जिल्हा, तालुका, शहर व ग्रामीण प्रतिनिधी नियुक्ती सुरू – इच्छुकांनी आजच संपर्क साधा! 9172843161 SUDINNEWS 9970473161

पुणे--नाशिक सरळ रेल्वे मार्गासाठी ९ ऑगस्टला महामार्गावर रास्ता रोको; जनआंदोलनाची हाक...!

Responsive Ad Here

 शासनाने रद्द केलेला पुणे - नसिक रेल्वे मार्ग

संगमनेर : (सुदिनन्यूज नेटवर्क)

पुणे - नाशिक सरळ रेल्वे मार्गाचा मूळ प्रस्ताव कायम ठेवावा आणि या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाला गती द्यावी, या मागणीसाठी ९ ऑगस्ट २०२६ (क्रांती दिन) रोजी भव्य जनआंदोलन आणि रास्ता रोको आंदोलन करण्यात येणार आहे. या आंदोलनाचे नेतृत्व माजी आमदार बाळासाहेब थोरात करणार असून, नाशिक–पुणे राष्ट्रीय महामार्गावरील वाहतूक काही काळ ठप्प करण्याचा इशारा देण्यात आला आहे.

आमदार सत्यजित तांबे यांनी याबाबत माहिती देताना नागरिकांनी या आंदोलनात मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन केले आहे. या आंदोलनात विविध लोकप्रतिनिधींसह शेतकरी, विद्यार्थी, युवक आणि नागरिकांचा मोठा सहभाग अपेक्षित असल्याचे त्यांनी सांगितले.

पुणे-नाशिक सरळ रेल्वे मार्गासाठी माजी आमदार बाळासाहेब थोरात आणि आमदार सत्यजित तांबे यांनी सातत्याने पाठपुरावा केला आहे. या मार्गासाठी सर्वप्रथम २००० साली बाळासाहेब थोरात यांनी तत्कालीन रेल्वेमंत्री ममता बॅनर्जी यांना पत्र देऊन मागणी केली होती. त्यानंतर महाविकास आघाडी सरकारच्या काळात या प्रकल्पाला गती मिळाली. प्रस्तावित रेल्वेमार्ग नाशिक, सिन्नर, संगमनेर, जुन्नर, नारायणगाव, मंचर, खेड, चाकण आणि पुणे या भागातून जाणार असून, या मार्गासाठी आवश्यक भूसंपादन पूर्ण करण्यात आले आहे. बाधित शेतकऱ्यांना सुमारे ६५० कोटी रुपयांची भरपाईही देण्यात आली आहे.

मात्र, राज्यात महायुती सरकार सत्तेवर आल्यानंतर या रेल्वेमार्गात बदल करून तो नाशिक–सिन्नर–शिर्डी–अहिल्यानगर–पुणे असा करण्याचा प्रयत्न झाल्याचा आरोप करण्यात आला आहे. त्यामुळे पश्चिम आणि उत्तर महाराष्ट्राला थेट जोडणारा, दळणवळण तसेच रोजगाराच्या दृष्टीने महत्त्वाचा असलेला मूळ मार्ग बदलण्याचा प्रयत्न का केला जात आहे, असा प्रश्न उपस्थित केला जात असून नागरिकांमध्येही तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.

या पार्श्वभूमीवर माजी आमदार बाळासाहेब थोरात यांनी केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांची भेट घेऊन मूळ मार्ग कायम ठेवण्याची मागणी केली होती. आमदार सत्यजित तांबे यांनीही विविध लोकप्रतिनिधींच्या बैठकीत तसेच विधान परिषदेत हा विषय सातत्याने मांडत रेल्वे मार्ग पूर्ववत ठेवण्याची भूमिका घेतली आहे.

दरम्यान, संगमनेरच्या काही नव्या लोकप्रतिनिधींनी सुरुवातीला रेल्वे प्रकल्पाला पाठिंबा दर्शविला होता. मात्र, त्यानंतर त्यांनी या विषयावर मौन बाळगल्याची टीका करण्यात येत आहे. अकोले आणि संगमनेर तालुक्यांमध्ये वाद निर्माण करण्याचा प्रयत्न झाला असला, तरी दोन्ही तालुक्यांच्या विकासासाठी हा रेल्वे मार्ग अत्यंत आवश्यक असल्याचे बाळासाहेब थोरात यांनी स्पष्ट केले आहे.

या रेल्वे मार्गाच्या समर्थनार्थ ९ ऑगस्ट रोजी माजी आमदार बाळासाहेब थोरात, खासदार डॉ. अमोल कोल्हे, खासदार राजाभाऊ वाजे,आमदार सत्यजित तांबे आणि माजी आमदार डॉ. सुधीर तांबे यांच्यासह विविध लोकप्रतिनिधींच्या उपस्थितीत रास्ता रोको आंदोलन करण्यात येणार आहे. या जनआंदोलनात विद्यार्थी, युवक, शेतकरी आणि नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन नाशिक–पुणे रेल्वे कृती समितीच्या वतीने करण्यात आले आहे.