तालुका अध्यक्ष पदी अजय फटांगरे, शहर अध्यक्षपदी सोमेश्वर दिवटे, तर कार्याध्यक्षपदी अमोल शेलकर यांची निवड..!
संगमनेर :(सुदिन न्यूज नेटवर्क)
महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या संघटन सर्जन अभियान अंतर्गत संगमनेर शहर व तालुका काँग्रेस कमिटीच्या नव्या पदाधिकाऱ्यांची घोषणा करण्यात आली आहे. या नियुक्त्यांमध्ये अजय नारायण फटांगरे यांची संगमनेर तालुका काँग्रेस कमिटीच्या अध्यक्षपदी, सोमेश्वर सूर्यभान दिवटे यांची शहर काँग्रेस अध्यक्षपदी फेरनियुक्ती, तर अमोल भारत शेलकर यांची संगमनेर तालुका काँग्रेस कमिटीच्या कार्याध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे.
या नियुक्त्या महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या मान्यतेने प्रदेश काँग्रेसचे वरिष्ठ उपाध्यक्ष ॲड. गणेश पाटील यांनी जाहीर केल्या आहेत.
संघटन सर्जन अभियानांतर्गत प्रदेश काँग्रेसने राज्यभर निरीक्षकांमार्फत विविध जिल्ह्यांतील पदाधिकारी, लोकप्रतिनिधी आणि कार्यकर्त्यांशी संवाद साधून प्राप्त झालेल्या शिफारशींचा विचार केला. त्यानंतर ब्लॉक अध्यक्ष आणि इतर पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या निश्चित करण्यात आल्या.
नवनियुक्त तालुकाध्यक्ष अजय नारायण फटांगरे हे युवक काँग्रेसपासून सक्रिय राजकारणात कार्यरत आहेत. त्यांनी युवक काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष म्हणून काम केले असून जिल्हा परिषदेच्या सभापतीपदाची जबाबदारीही यशस्वीपणे सांभाळली आहे.
शहराध्यक्ष म्हणून पुन्हा संधी मिळालेले सोमेश्वर सूर्यभान दिवटे हे युवक काँग्रेसच्या माध्यमातून राजकारणात सक्रिय झाले. सध्या ते संगमनेर नगर परिषदेचे नगरसेवक असून शहरातील संघटनात्मक कामात त्यांचा सक्रिय सहभाग राहिला आहे.
कार्याध्यक्षपदी नियुक्त झालेले अमोल भारत शेलकर हे २०२० पासून काँग्रेस पक्षात कार्यरत आहेत. विविध जनआंदोलनांमध्ये सक्रिय सहभागामुळे त्यांनी काँग्रेसमधील एक आंदोलनशील कार्यकर्ता म्हणून वेगळी ओळख निर्माण केली आहे. त्यांच्या नियुक्तीमुळे शहरातील नव्या दमाच्या नेतृत्वावर काँग्रेसने विश्वास व्यक्त केल्याचे मानले जात आहे.
या नियुक्तीचे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते व काँग्रेस वर्किंग कमिटीचे सदस्य, लोकनेते बाळासाहेब थोरात यांनी स्वागत करत नवनियुक्त पदाधिकाऱ्यांचे अभिनंदन केले. काँग्रेसचा सर्वसमावेशक, लोकशाही आणि राज्यघटना जपणारा विचार अधिक प्रभावीपणे जनसामान्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी ही नवी टीम जोमाने कार्य करेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
नवनियुक्त पदाधिकाऱ्यांचे माजी महसूल मंत्री तथा माजी प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात, आमदार डॉ. सुधीर तांबे, माजी नगराध्यक्ष दुर्गाताई तांबे, युवक काँग्रेसच्या नेत्या डॉ. जयश्रीताई थोरात, पांडुरंग पाटील गुले, रणजितसिंह देशमुख, डॉ. माधवराव कानवडे, शंकरराव खेमनर, सुधाकर जोशी, इंद्रजित थोरात, संपतराव डोंगरे, बाबा ओहोळ, रामहरी कातोरे, होशीराम सोनवणे, राजेंद्र गुंजाळ, निखिल पापडेजा, सुभाष सामळे, हैदर अली, गौरव डोंगरे, अर्चनाताई वाळांडे यांच्यासह विविध संस्थांचे पदाधिकारी व काँग्रेस कार्यकर्त्यांनी अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या.


