शासनाच्या लोकाभिमुख उपक्रमास नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद; विविध शासकीय सेवांचा लाभ एकाच ठिकाणी
संगमनेर (सुदिन
न्यूज नेटवर्क): राज्य शासनाच्या "श्रीमंत छत्रपती शिवाजी महाराज महाराष्ट्र समाधान शिबिर" या उपक्रमाला संगमनेर तालुक्यात उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. नागरिकांना विविध शासकीय सेवा व योजनांचा लाभ सुलभ आणि जलद पद्धतीने उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने आयोजित करण्यात आलेल्या या शिबिरात एकूण ५७८ विविध प्रकारची प्रमाणपत्रे लाभार्थ्यांना वितरित करण्यात आली.
या शिबिरात महसूल विभागासह विविध शासकीय विभागांनी सहभाग घेत नागरिकांच्या अर्जांची तातडीने छाननी करून आवश्यक प्रमाणपत्रांचे वितरण केले. त्यामुळे अनेक नागरिकांना वेगवेगळ्या कार्यालयांमध्ये वारंवार फेऱ्या मारण्याची गरज भासली नाही. शासनाच्या सेवा नागरिकांपर्यंत अधिक प्रभावी, पारदर्शक आणि सुलभ पद्धतीने पोहोचविण्याचा उद्देश या उपक्रमामागे असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले.
यावेळी उपस्थित अधिकाऱ्यांनी नागरिकांना विविध शासकीय योजनांची माहिती देत अर्ज प्रक्रियेबाबत मार्गदर्शन केले. शासनाच्या योजनांचा लाभ पात्र लाभार्थ्यांपर्यंत वेळेत पोहोचावा यासाठी प्रशासन सातत्याने प्रयत्नशील असून, अशा समाधान शिबिरांमुळे सामान्य नागरिकांचा वेळ, श्रम आणि आर्थिक खर्च यांची बचत होत असल्याचेही त्यांनी नमूद केले.
शिबिरात मोठ्या संख्येने नागरिकांनी सहभाग घेत विविध शासकीय सेवांचा लाभ घेतला. प्रमाणपत्रांचे वितरण, अर्जांची पूर्तता आणि विविध विभागांकडून देण्यात आलेल्या मार्गदर्शनामुळे नागरिकांनी समाधान व्यक्त केले. शासनाच्या लोकाभिमुख उपक्रमांमुळे प्रशासन आणि नागरिक यांच्यातील समन्वय अधिक दृढ होत असून, अशा शिबिरांचे आयोजन भविष्यातही सुरू राहणार असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले
