पोलिस निरीक्षक समीर बारवकर यांची निष्पक्ष भूमिका; व्यापारी व नागरिकांकडून कौतुक
संगमनेर (सुदिन न्यूज नेटवर्क): अनधिकृत ठिकाणी वाहने उभी करणाऱ्या सर्वसामान्य नागरिकांवर कारवाई करणारे पोलिस अनेकदा दिसतात. मात्र, सरकारी वाहनालाही त्याच निकषांवर दंड ठोठावत संगमनेर शहर पोलिसांनी "कायदा सर्वांसाठी समान आहे" हा संदेश कृतीतून दिला. पोलिस निरीक्षक समीर बारवकर यांनी तहसीलदारांच्या शासकीय वाहनावर वाहतूक नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी दंडात्मक कारवाई करण्याचे आदेश दिल्याने या घटनेची शहरात चांगलीच चर्चा रंगली.
गुरुवारी (दि. २) उपवर्गीकरणाच्या विरोधात प्रांताधिकारी कार्यालयावर मोर्चा येणार असल्याने नवीन नगर रोड परिसरात वाहतुकीची कोंडी होऊ नये, यासाठी पोलिसांनी विशेष मोहीम राबवली होती. रस्त्याच्या कडेला तसेच दुकानांसमोर अनधिकृतपणे उभ्या केलेल्या वाहनांवर दंडात्मक कारवाई सुरू करण्यात आली. या मोहिमेदरम्यान पोलिस निरीक्षक समीर बारवकर स्वतः उपस्थित राहून कारवाईवर लक्ष ठेवत होते. पोलिसांच्या सूचनेनंतर अनेक वाहनधारकांनी स्वतःहून आपली वाहने तेथून हलवली.
याचवेळी प्रांताधिकारी कार्यालयासमोर तहसीलदारांचे शासकीय वाहन (एमएच १६ डीजी ३२८४) चालकाने पोलिसांसमोरच रस्त्याच्या कडेला उभे केले. त्या ठिकाणी वाहने हटविण्याची कारवाई सुरू असतानाही चालकाने पोलिसांच्या सूचनांकडे दुर्लक्ष केल्याचे निदर्शनास आले.
वाहनामध्ये तहसीलदार उपस्थित नसल्याने पोलिस निरीक्षक बारवकर यांनी चालकाला वाहन तात्काळ बाजूला घेण्यास सांगितले. मात्र, चालकाने तत्काळ प्रतिसाद न दिल्याने त्यांनी त्याची कानउघाडणी केली. सरकारी वाहन असल्यामुळे कोणतीही सवलत न देता वाहतूक नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी वाहतूक पोलिसांना संबंधित वाहनावर दंड आकारण्याचे निर्देश दिले.
पोलिसांनी तत्काळ दंडाची कारवाई पूर्ण केली. त्यानंतर चालकाने वाहन तेथून हटवले. सरकारी वाहनावरही कोणताही मुलाहिजा न ठेवता कारवाई करण्यात आल्याने परिसरातील व्यापारी व नागरिकांनी पोलिस निरीक्षक समीर बारवकर यांच्या निष्पक्ष भूमिकेचे कौतुक केले. या घटनेमुळे कायद्यापुढे सर्व समान आहेत हा संदेश पुन्हा एकदा अधोरेखित झाला.
