Join Us

Call SUDINNEWS ब्रेकिंग : सुदिनन्यूजसाठी जिल्हा, तालुका, शहर व ग्रामीण प्रतिनिधी नियुक्ती सुरू – इच्छुकांनी आजच संपर्क साधा! 9172843161 SUDINNEWS 9970473161

सेट परीक्षा पुढे ढकलली; आता ६ सप्टेंबर रोजी होण्याची शक्यता

Responsive Ad Here

                                   सेट परीक्षा पुढे ढकलली; आता ६ सप्टेंबर रोजी होण्याची शक्यता

                          अंतिम वेळापत्रक पुढील १५ दिवसांत जाहीर होणार; उमेदवारांना दिलासा

पुणे (सुदिनन्यूज नेटवर्क)

सहाय्यक प्राध्यापक पदासाठी आयोजित करण्यात येणारी ४३ वी राज्यस्तरीय पात्रता परीक्षा (SET) पुढे ढकलण्यात आली असून, आता ही परीक्षा ६ सप्टेंबर रोजी होण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. परीक्षेची सुधारित तारीख आणि सविस्तर वेळापत्रक पुढील १५ दिवसांत अधिकृत संकेतस्थळावर प्रसिद्ध केले जाणार असल्याची माहिती संबंधित विद्यापीठाने दिली आहे.

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने प्रसिद्ध केलेल्या निवेदनानुसार, राज्य शासनाची समन्वयक संस्था म्हणून विद्यापीठ महाराष्ट्र आणि गोवा राज्यात SET परीक्षा आयोजित करते. यापूर्वी ही परीक्षा २६ जुलै रोजी घेण्याचे नियोजन करण्यात आले होते.

मात्र, त्याच दिवशी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (MPSC) सरळसेवा भरतीअंतर्गत विविध विषयांच्या परीक्षा आयोजित करण्यात आल्या आहेत. त्यामुळे दोन्ही परीक्षा एकाच दिवशी आल्याने अनेक उमेदवारांना अडचणी निर्माण होण्याची शक्यता होती. याशिवाय ७ ते २५ जुलै या कालावधीत होणाऱ्या आषाढी वारीमुळे राज्यातील अनेक भागांत मोठ्या प्रमाणावर वाहतुकीत बदल आणि गर्दी होणार असल्याने परीक्षेसाठी प्रवास करणाऱ्या उमेदवारांना गैरसोय होऊ शकते, अशी बाबही लक्षात घेण्यात आली.

या पार्श्वभूमीवर विविध स्तरांतून SET परीक्षा पुढे ढकलण्याची मागणी करण्यात आली होती. उमेदवारांची गैरसोय टाळण्यासाठी आणि परीक्षा सुरळीत पार पाडण्यासाठी विद्यापीठाने परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला आहे.

विद्यापीठाने स्पष्ट केले आहे की, ६ सप्टेंबर ही सध्या संभाव्य परीक्षा तारीख निश्चित करण्यात आली आहे. या तारखेबाबत कोणतीही शैक्षणिक किंवा प्रशासकीय अडचण आढळल्यास आवश्यक पडताळणी करून अंतिम निर्णय घेतला जाईल.

तसेच, सुधारित परीक्षा वेळापत्रक, अर्ज प्रक्रियेशी संबंधित सूचना आणि इतर महत्त्वाची माहिती पुढील १५ दिवसांच्या आत अधिकृत संकेतस्थळावर प्रसिद्ध केली जाणार असल्याचेही विद्यापीठाने नमूद केले आहे.

या निर्णयामुळे MPSC आणि SET या दोन्ही परीक्षांची तयारी करणाऱ्या हजारो उमेदवारांना मोठा दिलासा मिळाला असून, परीक्षेच्या नियोजनासाठी त्यांना अतिरिक्त वेळ उपलब्ध होणार आहे.